Car insurance
रोजच्या वापरात असणाऱ्या अन्नधान्याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांची, गुणदोषांची माहिती आपण घेतो आहोत. आज आपण अजुन काही धान्यांची माहिती घेऊ या.

च्या अंकात आपण तांदळाचे गुणधर्म पाहिले. त्यात तांबडा तांदूळ, साठेसाळीचा तांदूळ गुणांनी उत्तम असतो हेही पाहिले. अजून एक सांगायचे म्हणजे तो ज्या जमिनीत तयार होतो त्यानुसारही त्याचे गुण बदलतात.

दग्धायामवनौ जाताः शालयो लघुपाकिनः ।

कषाया बद्धविण्मूत्रा रुक्षाः श्‍लेष्मापकर्षणाः ।।

… सुश्रुत सूत्रस्थान

भाजलेल्या जमिनीत होणारा तांदूळ पचायला हलका, किंचित तुरट, मलमूत्र कमी करणारा, रुक्ष व कफदोष कमी करणारा असतो. तर साध्या म्हणजे अगोदर भाजून न घेतलेल्या जमिनीत पिकविलेला तांदूळ कफ-पित्तनाशक व जाठराग्नीचे वर्धन करणारा असतो.

अगोदर रोपे तयार करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी रोवून तयार झालेला तांदूळ पचण्यास अतिशय हलका, गुणांनी श्रेष्ठ असतो, लवकर शिजतो, सर्वदोषनाशक, शक्तिवर्धक व मूत्रल असतो.

बाजरी

ज्वारीप्रमाणे बाजरीचा चरक-सुश्रुतादि आर्ष ग्रंथात उल्लेख नाही, मात्र निघण्टुरत्नाकर बाजरी संबंधी सांगतात,

साजको वातलो हृद्यो बल्यः कान्तिकरो मतः ।

अग्निदीप्तिकरश्‍चोष्णो रुक्षः पित्तप्रकोपणः ।।

… निघण्टु रत्नाकर

बाजरी गुणाने रुक्ष व त्यामुळे वातुळ असते, मात्र हृदयाला हितकर, पचण्यास वेळ लागणारी असली तरी ताकद वाढवणारी असते. उष्ण वीर्याची असल्याने पित्त दोषाचा प्रकोप करवते. स्त्रीमधे काम उत्पन्न करणारी पण पुरूषाचे पुरुषत्व कमी करणारी असते.

नाचणी

लाल रंगाच्या या धान्यापासुन भाकरी, पापड वगैरे बनवता येतात. याला संस्कृतमधे नर्तक असे म्हणतात.

नर्तकस्तुवरस्तिक्तो मधुरः तर्पणो लघुः ।

बल्यः शीतः पित्तहरस्त्रिदोषशमनो मतः ।।

रक्तदोषहरश्‍चैव मुनिभिः पूर्वमीरितः ।।

… निघण्टु रत्नाकर

नाचणी अथवा नागली चवीला मधुर व तुरट, कडवट असते. पचायला हलकी असते, तर्पण म्हणजे सर्व शरीरधातुंचे समाधान करणारी असते, ताकद वाढवते. तीन्ही दोषांचे शमन करणारी असली तरी विशेषत्वाने पित्ताचे शमन करते, रक्तातील दोष दुर करणारी असते. बऱ्याचदा लाल रंगामुळे का काय पण नाचणी उष्ण असते असा समज आढळतो पण निघण्टुरत्नाकरातल्या या श्‍लाकावरुन नाचणी शीतल असते हे समजते.

उपवासाच्या दिवशी भगरीचा भात किंवा वरीचा भात करतात तेही एक धान्यच असते.

वरको मधुरो रुक्षस्तुवरो वातपित्तकृत्‌ ।

… निघण्टु रत्नाकर

वरी चवीला मधुर व थोडीशी तुरट, रुक्षता वाढविणारी व वात-पित्तदोष वाढविणारी असते.

उपवासासाठी राजगिराही वापरला जातो. याचे आयुर्वेदाने दोन प्रकार केलेले आहेत. लघु म्हणजे लहान राजगिरा व बृहत्‌ म्हणजे मोठा राजगिरा.

लघु राजगिरः प्रोक्‍तः कफकृत्सारको गुरुः ।

निद्रालस्यकरः पथ्यः मलावष्टंभकारकः ।।

… निघण्टु रत्नाकर

लहान राजगिरा कफवर्धक व पचायला जड असल्याने निद्राकर व आळस वाढविणारा असतो. वीर्याने शीतल, रुचकर व पित्तशामक असतो, मलावष्टंभ करणारा असतो, मात्र योग्य प्रमाणात सेवन केला असता पथ्यकर असतो.

बृहत्‌ राजगिरः पथ्यः सारकः चातिशीतलः ।

पित्तनाशकरश्‍चैव मुनिभिः परिकीर्तितः ।।

… निघण्टु रत्नाकर

राजगिरा पथ्यकर, शीतल व सारक व पित्तनाशक असतो.

धान्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदात सांगितली आहे की सर्व धान्ये वर्षभर जुनी करून वापरावीत.

सर्वं नवीनं धान्यं तु गुरु स्वादु कफप्रदम्‌ ।

स्तंभकरं तच्च द्विवर्षे लघु पथ्यकृत्‌ ।।

वर्षे तृतीयं विरसम्‌ ।।

… निघण्टु रत्नाकर

एका वर्षाच्या आतले धान्य पचायला जड, कफवर्धक व मलावष्टंभ करणारे असते. वर्षानंतरचे धान्य पचायला हलके व पथ्यकर बनते, मात्र दोन वर्षांनंतर तिसऱ्या वर्षी विरस म्हणजे निःसत्त्व बनते.

- डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदाच्या इतिहासात एक गोष्ट आहे. जीवक नावाचे एक तरुण वैद्य आपल्या गुरुंकडे आयुर्वेद शिकत होते. ते अतिशय बुद्धिमान होते, गुरुंनी शिकवलेले त्यांना चटकन समजत असे व कायमचे लक्षातही राहत असे. या पद्धतीने सात वर्षे शिक्षण घेतल्यानंतर एक दिवस त्यानी गुरुला विचारले की माझे शिक्षण पूर्ण झाले आहे का नाही हे कसे समजावे? यावर गुरुंनी उत्तर दिले की बागेत काम करण्याची खुरपणी घेऊन चारही दिशांनी प्रवास कर व जे औषधी नाही असे द्रव्य घेऊन ये.
जीवक निघाले, काही दिवसांनी परत येऊन म्हणाले, आचार्य मी चारही दिशांना खूप फिरलो पण मला औषधी नाही असे काहीच सापडले नाही. यावर गुरु म्हणाले, तुझे शिक्षण पूर्ण झाले. पुढे हेच वैद्य राजवैद्य झाले.

ही गोष्ट इथे सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याही घरात, आसपास असणाऱ्या सर्व नैसर्गिक गोष्टींमधे काही ना काही औषधी गुण असतात. यांची योग्य योजना करता आली तर ते घरगुती उपचारच होत. सध्याचे दिवस आहेत उन्हाळ्याचे. उष्णतेने शरीरातील पित्तदोष वाढणे स्वाभाविक असते. अशावेळी करता येण्यासारखे घरगुती उपचार याप्रमाणे होत.

उन्हाळ्यात पाणी पिऊनही समाधान होत नाही, ओठ, घसा कोरडे पडतात, हातापायाच्या तळव्यांची आग होते, अशावेळी साधारण एक लिटर पाण्यात दोन सुके अंजीर, मुठभर मनुका आणि दोन चमचे धने घालून हे सर्व मिश्रण रात्रभर माठात ठेवावे. सकाळी रवीने घुसळून, गाळून पुन्हा माठात ठेवावे. दिवसभरात हे पाणी थोडे थोडे प्यायल्यास ऊन्हाळ्याचे त्रास कमी होतात. ऊन्हाळ्यामधे थकल्यासारखे वाटते तेही कमी होते.

उन्हाळ्यामधे द्राक्षे मिळतात. द्राक्षांचा रस हा उन्हाळ्यातील ऊष्णता कमी करण्यासाठी उत्कृष्ट असतो. द्राक्षाच्या रसात चिमुटभर जीरेपुड आणि चिमुटभर बडिशेपेची पूड टाकुन प्यायले असता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे क्षीण झालेला रसधातु पुन्हा टवटवीत होतो. द्राक्षे वार्याने थंड असल्याने अंगाचा दाह, मूत्राचा दाह वगैरे लक्षणे कमी होतात.

बऱ्याच व्यक्‍तींना उन्हाळ्यात डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, दुखणे वगैरे त्रास होतात. संगणकावर वा प्रखर प्रकाशात काम करणाऱ्यांना तर उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवणे उत्तम असते. शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा न तापवलेल्या कच्च्या, थंड किंवा तापवून गाळून घेतलेल्या दुधाच्या घड्या ठेवण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.

* उन्हाळ्यात लहान मुलांना तसेच त्वचा असणाऱ्यांना घामोळे येताना दिसते, यावर खरबूजाचा गर लावण्याचा उपयोग होतो.

* उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ होत असल्यास दुधीचा कच्चा कीस बांधून ठेवण्याचा तसेच दूर्वांच्या लॉनवर अनवाणी चालण्याचा उपयोग होतो.

* उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्यक्ष उन्हात जाण्याचे टाळणेच हितकर असते. पण उन्हात जावे लागलेच तर उन्हाचा त्वचेवर परिणाम होऊ नये, त्वचा काळवंडू नये यासाठी चेहरा, हात वगैरे उन्हाचा संपर्क आलेल्या ठिकाणी घरचे ताजे लोणी चोळणे उत्तम असते.

* उन्हाळ्यात लघवी करताना आग होणे, लघवीचा रंग गडद होणे वगैरे लक्षणे असल्यास कपभर दुधात अर्धा चमचा चंदनाचे गंध व चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास लघवीला साफ होऊन बरे वाटते.

* उष्णता बाधू नये म्हणून उन्हाळ्यात शीतल द्रव्याची उटणी लावावीत असे आयुर्वेदात सुचविले आहे. अनंतमूळ, वाळा, चंदन, ज्येष्ठमध वगैरे शीतल, सुगंधी व वर्णात हितकर द्रव्यांचे चूर्ण व मुगाच्या डाळीचे पीठ यापासून तयार केलेल्या उटणे लावून स्नान करणे उन्हाळ्यात उत्तम होय.

उन्हाळ्यानंतर येतो पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होत असते. शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट असते.

* गवती चहा, आले, तुळशी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतबंध होतो व पचनशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते.

* ओवा, तीळ, ज्येष्ठमध, सैंधव वगैरे द्रव्यांपासून बनविलेली सुुपारीपावसाळ्यात जेवणानंतर खाणे हितावह असते, याने पचनाला मदत होते.

* पावसाळ्यात पुदिना हे सुद्धा मोठे घरगुती औषध आहे. जेवणात पुदिन्याची ताजी पाने, काळी द्राक्षे, जिरे, हिंग, सैंधव, मिरी यापासून बनविलेली चटणी खाण्याचा उपयोग होतो. याने तोंडाला रुची येते, शिवाय पचनास मदत मिळते.

* दुपारच्या जेवणानंतर किसलेले आले व पुदिन्याचा रस टाकून ताक घेण्यानेही पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते. विशेषतः जुलाब, आव वगैरे त्रासांना प्रतबंध होतो.

* पावसाळ्यात वातदोष वाढतो. वात वाढला की त्यापाठोपाठ दुखणेआलेच. संधिवात, आमवात वगैरे दुखणे असणाऱ्यांना याचा अनुभव येतोच. अशा व्यक्‍तींनी व इतरांनीही पावसाळ्यात सुंठ-गूळ-तूप यापासून बनविलेली लहान सुपारीच्या आकाराची गोळी घेणे चांगले असते. याने वातदोष नियंत्रित होण्याबरोबर पचनालाही मदत मिळते.

* पावसाळ्यात भूक लागत नसली, पोट जड वाटत असले, गॅसेस अडकून राहिले आहेत असे वाटत असले तर लिंबू व आल्याच्या रसाच्या मिश्रणात थोडी जिरे पूड व सैंधव टाकून तयार केलेले चाटण थोडे थोडे चाटणे उत्तम असते.

* हिंग्वाष्टक नावाचे चूर्ण पावसाळ्यात उत्तम होय. त्रास असो वा नसो, प्रकृतीनुसार पाव ते अर्धा चमचा चूर्ण व थोडेसे तूप भाताच्या पहिल्या घासाबरोबर घेण्याने भूक लागायला मदत होते, अन्न व्यवस्थित पचते.

* पावसाळ्यात तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हितावह असते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल वापरणे अधिक हितावह असते.

* जंत होऊ नयेत व झालेले जंत नष्ट व्हावेत यासाठी उपाययोजना करणे एरवीही चांगले असते. पावसाळ्यात मात्र याकडे विशेषतः द्यावे लागते. त्यादृष्टीने महिन्यातून आठ दिवस सकाळी चमचाभर वावडिंगाचे चूर्ण मधासह घेणे चांगले असते. कढीलिंबाची ताजी पाने वाटून केलेली गोळी अधून मधून घेण्याचाही उपयोग होतो.

* पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता सर्वाधिक असते. यास प्रतबंध होण्याच्या दृष्टीने घर, ऑफिस, दवाखाने वगैरे सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे धूप करणें उत्तम असते. यासाठी कडुनिंबाची पाने, वावडिंग, कापूर, ऊद वगैरे द्रव्यांचे मिश्रण वा तयार ‘संतुलन प्युरिफायर धूप’ वापरता येतो.

पावसाळ्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी येणाऱ्या शरद ऋतूत पुन्हा एकदा पित्त वाढत असते किंबहुना पित्ताचा प्रकोप ह्याच काळात होत असल्याने उन्हाळ्यात घ्यायची काळजी पुन्हा या दिवसात घेणे आरोग्यरक्षणासाठी चांगले असते.

तसे पाहता हिवाळा हा आरोग्यदायक काळ असतो. या दिवसात अग्नी प्रज्वलित होतो, शरीरशक्‍ती आपोआपच वाढते. थंडीचा त्रास होऊ नये व निसर्गतः वाढणाऱ्या शरीरशक्‍तीला घरगुती उपायांची जोड मिळून ताकद कमवून ठेवता यावी यासाठी निश्‍चित प्रयत्न करता येतात.

* हिवाळ्यात नियमित अभ्यंग करणे उत्तम असते. यामुळे थंडीचे निवारण होते व शरीरशक्‍ती वाढायला मदत होते.

* थंडीमुळे त्वचा कोरडी होण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी अगोदर अंगाला तेल लावून नंतर अगरू, जटामांसी, केशर, वगैरे द्रव्यांनी युक्‍त “सॅन मसाज पावडर’सारख्या उटण्याने स्नान करण्याने हिवाळ्यात उत्तम असते.

* थंडीमुळे सर्दी, खोकला होऊ नये, तसेच शरीरात कफदोष साठू नये यासाठी हिवाळ्यात नेहमीच्या चहात गवती चहा टाकणे चांगले असते.

* हिवाळ्यात जेवणानंतर त्रयोदशी विडा म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने बनविलेला विडा खाण्याचाही उपयोग होतो. याने अतिरिक्‍त कफदोष कमी होऊन पचन चांगले होते.

* हिवाळ्यात बदामाची खीर खाणे चांगले असते. रात्री चार बदाम भिजत घालावेत, सकाळी साले काढून बारीक वाटावेत व दुधात कालवून थोडे आटवावे. यात खडीसाखर व थोडे तूप टाकून तयार झालेली खीर सकाळी खावी.

* डिंकाचे लाडू, कोहळेपाक, गव्हाची खीर आदी धातुपोषक पदार्थांचा आहारात समावेश करणेही हिवाळ्यात हितकर असते.

- डॉ. श्री बालाजी तांबे
balaji on May 3rd, 2009

बऱ्याच बंगल्यांवर ‘श्रमसाफल्य’ असे नाव दिलेले आढळते. असे नाव बघितल्यावर कुणाचे श्रम कुठे सफल झाले हा एक मोठा प्रश्‍न पडतो. “इच्छापूर्ती’ असे म्हटल्यास बंगल्याच्या मालकाची इच्छा पूर्ण झाली असे म्हणता येते पण श्रम केले एकाने आणि त्याची सफलता दुसऱ्याच्या नावावर, असे काहीसे विचित्र भाव ‘श्रमसाफल्य’ हे नाव वाचल्यावर मनात येतात.

श्रम वा कर्म केल्याशिवाय कुणालाच राहता येत नाही. प्रत्येकाने श्रम करावेतच. जीवन चालविण्यासाठी आवश्‍यक असते ती उपजीविका आणि उपजीविकेसाठी कुठले तरी काम करणे आवश्‍यक असतेच. उपजीविकेसाठी लागते अन्न, वस्त्र, निवारा व पैसा आणि हे मिळविण्यासाठी करावे लागते काम. उपजीविका या शब्दातील ‘उप’ शब्दाचा अर्थ ‘दुय्यम’ असा आहे. मग मनुष्याची मुख्य जीविका कोणती? मुख्य जीविका योग्य तऱ्हेने निभावण्यासाठी लागते करुणा, प्रेम, श्रद्धा, सेवा व समाधान आणि हे गुण मिळविण्याचा प्रयत्न न केल्यास जीवन व्यर्थ जाते.

मनुष्यमात्राने कर्माचा विचार करताना ‘धर्म’ म्हणजे कर्मकांड, ‘अर्थ’ म्हणजे केवळ पैसा मिळविणारे कर्म, ‘काम’ म्हणजे शरीर व मन यांना सुखविणारे कर्म हा विचार करून मोक्षासाठीचे कर्म म्हणजे ज्ञान व अनुभव मिळविणे हे सवड मिळाल्यास करावयाचे म्हणून शेवटी बाजूला ठेवले. जीविकेचे अधिष्ठान असल्याशिवाय उपजीविका उपयोगाची नाही. कर्म नैतिकतेवर आधारितच हवे आणि असे कर्म करताना घडणाऱ्या श्रमांचा परिहार करण्याची योजना प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे. प्रत्येक व्यवसाय करत असताना त्यात श्रम अभिप्रेत असतातच. त्याचे आरोग्यावर चांगले-वाईट परिणामही होत असतातच. आरोग्य टिकवता आले नाही तर उपजीविकेचे साधन म्हणून केलेले श्रम मुख्य जीविताच्या आड येतात. म्हणून आयुर्वेदानुसार प्रत्येकाने स्वतःची प्रकृती समजून घेऊन आहार-विहाराची योजना करावी. आहाराचे महत्त्व आपण समजू शकतो. त्याकडे लक्ष दिलेही जाते, कारण चुकीचे खाल्ल्यानंतर पोट ताबडतोब बिघडते. तसेच अमुक एका रोगात अमुक आहार चालणार नाही याची माहिती लगेच मिळते. परंतु, विहाराच्या बाबतीत औदासिन्य दिसून येते. फिरायला जाणे, चालणे आरोग्यासाठी चांगले असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत चालणे जमत नाही. अशा स्थितीत चालणे टाळल्यासच आरोग्य टिकू शकते. कोणासाठी सायकलिंग करणे चांगले असते तर कोणासाठी जिममध्ये जाणे चांगले असते. कोणी पळावे वा कोणी कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत हे प्रकृती पाहूनच ठरवावे लागते. योग आणि प्राणायाम हे प्रकार सर्व लोकांना जमण्यासारख्या विहारात मोडतात. पण, त्यातही कुठले प्रकार वा कुठल्या पद्धती आपल्यासाठी योग्य आहेत हे ठरवावेच लागते. अनेकदा या साऱ्या विषयांतही सर्वसामान्यांमध्ये बरीच जागरूकता दिसते. पण व्यवसाय कुठला निवडावा याबाबतीत मात्र आरोग्याच्या अंगाने विचार केलेला नसतो.

ज्या व्यवसायात कीर्ती, प्रसिद्धी, मान व पैसा खूप खूप मिळेल असा व्यवसाय चांगला असे समजून प्रत्येक जण काही विशिष्ट व्यवसायांच्या मागे लागलेले दिसतात. त्यामुळे ऊठ सूट प्रत्येक जण इंजिनिअर वा डॉक्‍टर होतो किंवा ‘आयटी’च्या मागे लागतो. त्या व्यवसायामुळे आरोग्याला होणारे धोके समजून घेतलेले नसतात. उन्हात कोणी काम करावे, भट्टीजवळ कोणी काम करावे, डोंगरावरची हवा कोणाला मानवेल व समुद्राच्या जवळ कोणी व्यवसाय निवडावा या दृष्टीने विचार करणे आवश्‍यक असते. त्यातल्या त्यात शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा विचार करणे खूपच आवश्‍यक असते.

डोक्‍यावर वजन उचलणे चांगले का? डोक्‍याचा उपयोग सहसा वजन उचलण्यासाठी करायला लागू नये. अशा तऱ्हेने वजन उचलावे लागू नये म्हणून बऱ्याच प्रगत राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या यंत्रांचे शोध लागलेले दिसतात. परंतु, डोक्‍यावर वजन वाहण्याची वेळ आलीच तर काय काळजी घ्यावी याचा विचार करणे आवश्‍यक आहे. कोणत्याही कठीण गोष्टीचा डोक्‍याला स्पर्श होऊ नये म्हणून डोक्‍यावर मऊ वस्त्र घेतल्याशिवाय डोक्‍यावर ओझे ठेवू नये. मेंदूला आणि मस्तकाला पूरक गोष्टी आहारात अवश्‍य ठेवाव्यात. रात्री झोपताना न चुकता नाकात व कानात तुपा-तेलाचे थेंब टाकावेत. टाळूवर आयुर्वेदिक ‘संतुलन ब्रह्मलीन तेल’ किंवा नुसते एरंडेल तेल चोळावे.

डोक्‍यावर ओझे उचलावे लागलेच तर मानेचे स्नायू कडक होतील इतका वेळ उचलू नये. रात्री झोपण्यापूर्वी पाठीवर ‘संतुलन कुंडलिनी तेल’ चोळावे. प्रत्येक कारखान्यात व बांधकामक्षेत्रात सामानाची वाहतूक करावी लागतेच. त्यासाठी श्रम करावे लागतात. शेतात आणि बांधकामक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना बऱ्याच अंगमेहनतीचे काम करावे लागते. त्यांना अशा कामाची सवय झाली असे वाटले तरी त्यांनाही शरीराची काळजी घेणे आवश्‍यक असतेच. त्यांनी स्वतःच्या शरीरप्रकृतीनुसार डॉक्‍टरांना भेटून सल्ला घेऊन त्यानुसार वागणे योग्य ठरते. त्यांना कामावर ठेवणाऱ्यांनी त्यांच्यासाठी अशा तपासणीची योजना करून त्यांना सल्ला मिळेल याकडे लक्ष देणेही आवश्‍यक ठरते.

संगणकासमोर काम करणाऱ्यांना संगणकाच्या चकाकणाऱ्या पडद्याचा त्रास होऊ नये यासाठी डोळ्यात काजळ घालणे, रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, शरीरात थंडाई येण्यासाठी दूध-साखर वा ‘संतुलन पित्तशांती’सारखे पित्तशामक द्रव्य घेणे आवश्‍यक असते.

शिक्षक, लेक्‍चरर्स, प्रोफेसर्स, वकील या व्यवसायातील लोकांना खूप बोलावे लागत असल्यामुळे त्यांनी रोज वा आठवड्यातून काही दिवस हळद-मीठ टाकून गरम पाण्याने गुळण्या करणे, सीतोपलादी सारखे चूर्ण तूप-मधाबरोबर घेणे, दिवसातून काही तास तरी न बोलणे इत्यादी पथ्ये पाळणे आवश्‍यक असते. वकिलीसारख्या व्यवसायात खऱ्या-खोट्याची चर्चा असते आणि खूप मानसिक ताण येऊ शकतो. अशा व्यक्‍तींनी मेंदूसाठी ‘संतुलन शतदाम’ सारखा शतावरी बदामयुक्‍त पौष्टिक कल्प घेणे, सुवर्णाचा प्रक्षेप झालेला ‘संतुलन आत्मप्राश’सारखा एखादा कल्प घेणे आणि मेंदूला उपयोगी पडतील अशा रसायनांचे सेवन करणे आवश्‍यक असते. कफप्रकृतीच्या व्यक्‍तीने बैठी कामे अधिक करू नयेत. तसेच वातप्रकृतीच्या व्यक्‍तीने जास्त फिरतीची कामे करू नयेत.

व्यवसायातून उद्भवणारे अनेक प्रकारचे शारीरिक अपाय टाळण्यासाठी ते कर्म कसे करावे याचे प्रशिक्षण नक्की घ्यावे. साधे रस्ता साफ करण्याचे काम असले तरी तो कमीत कमी शारीरिक श्रमात, बसून किंवा वाकून कसा झाडावा हे शिकून घेणे गरजेचे असते. व्यवसायामुळे होणारे आजार टाळणे आवश्‍यक आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करणे आवश्‍यक असते. अन्यथा, उपजीविकेचे साधन जीवन नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

व्यावसायिक आजाराचा विचार करीत असताना श्रम करण्यासाठी फुप्फुसांच्या ताकदीची खूप आवश्‍यकता असते. शरीर सुंदर व सुदृढ असले पण फुप्फुसांमध्ये ताकद नसली, छाती फुगण्याची क्षमता नसली तर श्रम करणे जमत नाही. धुळीचे कण अधिक प्रमाणात असणाऱ्या ठिकाणी काम करावे लागल्याने बऱ्याच वेळा अनेक जण फुप्फुसांच्या विकाराने आजारी पडतात असे दिसते. दुधासरखे एखादे पेय घेऊन यासारखा त्रास टाळण्याचा प्रयत्न करता येतो. तसेच कारखान्यातून येणारा धूर, उडणारे रंगाचे कण किंवा लाकूड कापण्याच्या कारखान्यात उडणार धुरळा यामुळे फुप्फुसांची क्षमता कमी होते. हे सारे घटक फुप्फुसांच्या विकाराला कारणीभूत ठरतात. अशा वेळी आधीच दम्यासारखा विकार असला तर श्रम करण्यास अडचणी येणे साहजिक असते. त्यासाठी नाका-तोंडावर फिल्टर बांधून काम करणे योग्य असते. अशा व्यक्‍तींनी प्राणायामासारखा श्‍वसनप्रकार नियमित केल्यास अशा त्रासांपासून दूर राहता येणे शक्‍य असते.

एकंदरीत श्रमप्रतिष्ठा जपण्यासाठी कामातील नैतिकता आणि शरीराचे आरोग्य जपणे आवश्‍यक असते.

आयुर्वेदात आहाराविषयी अतिशय परिपूर्ण असे मार्गदर्शन केलेले आढळते. आहार प्रकृतीनुरूप असावा ही आयुर्वेदाची मुख्य संकल्पना. अर्थात, ही अंमलात आणायची तर त्यासाठी स्वतःची प्रकृती माहीत असायला हवी व आहारातील प्रत्येक वस्तूचे गुण-दोष कळायला हवेत. रोजच्या जेवणात असायलाच हव्या अशा गहू, तांदूळ, मूग-तूरीपासून ते भाज्या, फळे, दूध, ताक वगैरे सर्व पदार्थांचे गुण, त्यांचा स्वभाव, त्यांचा दोषांवर होणारा परिणाम या सर्वांचे आयुर्वेदात विस्तृतपणे वर्णन केलेले आढळते.

आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथांमध्ये “पाककृती’ समजावल्या आहेत.

पाककृती ज्या घटकद्रव्यांपासून बनलेली असते त्यांचे आपापले स्वतंत्र गुणधर्म असतात पण त्यांचा संयोग झाल्यामुळे व पाककृती तयार करताना केल्या जाणाऱ्या संस्कारांमुळे तयार पदार्थांचे गुणधर्म विशेष असू शकतात. म्हणूनच पाककृती बनवताना कोणती घटकद्रव्ये कशा प्रकारे, किती प्रमाणात मिसळावीत या सर्वांचे एक शास्त्र असते. आयुर्वेदिक पाककृतींमध्ये याला खूप महत्त्व दिलेले आढळते. उदाहरणादाखल काही ग्रंथोक्‍त पाककृती याप्रमाणे सांगता येतील.

मोहनभोग

निघण्टुरत्नाकरात मोहनभोग या नावाची एक पाककृती दिलेली आहे. यात तूप, रवा, दूध, साखर ही मुख्य द्रव्ये आहेत. यांचे स्वतंत्र गुणधर्म असे होत.

तूप - शक्‍तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढविणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक.

गव्हाचा रवा - गहू हे स्निग्ध, धातुवर्धक, पौष्टिक व बलकारक असतात. पण पचयाला थोडे जड व कफकारक असतात. गव्हापासून तयार केलेल्या रव्यात गव्हाचे बाकीचे गुण आले तरी जडपणा व कफ वाढण्याची प्रवृत्ती कमी झालेली असते.

दूध - शीत गुणाचे, स्निग्धता देणारे, एकंदर जीवनशक्‍ती वाढविणारे, वात-पित्तशामक व बलवर्धक.

साखर - वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्‍ती वाढविणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी.

मोहनभोगाची ग्रंथात सांगितलेली पाककृती अशी - तूप ताजे कढवावे व त्यात समप्रमाणात गव्हाचा बारीक रवा घालून पळीने ढवळावा. त्यात तुपाइतकेच दूध थोडे थोडे शिंपावे. रव्यामध्ये दूध जिरले व तूप सुटू लागले की रव्याइतकी साखर घालावी तसेच वेलची, लवंग, मिरे यांचे चूर्ण मिसळून नीट एकजीव झाले की विस्तवावरून खाली उतरावे.

तयार झालेल्या मोहनभोगाचे गुण पुढीलप्रमाणे सांगितलेले आहेत.

बल्यो वृष्यो गुरुः स्निग्धः कफकृत्‌ धातुवर्धनः ।

रसे पाके च मधुरो वातपित्तविनाशनः ।।

मोहनभोग ताकद वाढवतो, शुक्रधातूची शक्‍ती वाढवतो, पचायला जड, कफ करणारा असतो. स्निग्धता देतो. धातू वाढवतो, चवीला व विपाकाने मधुर असतो, तसेच वात-पित्तदोषांचे शमन करतो.

रसालाशिखरिणी

श्रीखंड या पक्वान्नाला आयुर्वेदात “रसालाशिखरिणी’ म्हटलेले आहे. यामध्ये पाणी निथळून गेलेले दही म्हणजे चक्का, मध, तूप, साखर, दालचिनी, नागकेशर, वेलची, तमालपत्र, मिरे, सुंठ ही घटकद्रव्ये असतात. यांचे गुण पुढील प्रमाणे आहेत.

दही - कफवर्धक, पचायला जड, वातशामक, शरीराला स्निग्धता देणारे, पुष्टिकर.

मध - कफदोषशामक, पचायला हलके, आवाज सुधारणारे, प्रमाणापेक्षा अधिक असणाऱ्या मेदाला कमी करणारे, रुचकर, रुक्ष.

तूप - शक्‍तिवर्धक, श्रमांचा परिहार करणारे, वात-पित्तशामक, शरीराची कांती वाढविणारे, शरीराला दृढ करणारे, वीर्यवर्धक.

साखर - वात-पित्तशामक, शीत गुणाची, वीर्यशक्‍ती वाढविणारी, चक्कर व थकवा यांना दूर करणारी, दाह कमी करणारी.

दालचिनी, नागकेशर, वेलची व तमालपत्र ही चार द्रव्ये मिळून “चातुर्जात’ गण तयार होतो. हा कफनाशक, रुचवर्धक, आमपाचक असा असतो.

मिरे व सुंठ - हे दोघेही चवीला तिखट, अग्निवर्धक, पाचक व कफनाशक असतात.

रसालाशिखरिणी बनविण्याची पद्धत

पाणी निथळून गेलेल्या दह्याच्या निम्म्या प्रमाणात साखर घ्यावी. मध व तूप साखरेच्या एक सोळांश प्रमाणात घ्यावा. चातुर्जातगणाची चारही द्रव्ये मधाच्या एक अष्टमांश प्रमाणात घ्यावीत तर मिरपूड व सुंठ मधाइतकीच घ्यावी.

हे सर्व एकत्र करावे, कापराच्या सुगंधाने सुवासिक केलेल्या भांड्यावर सुती स्वच्छ कापड बांधावे व त्यावर हळू हळू घासावे.

गुण - वातपित्तशामक, शुक्रवर्धक, बलवर्धक, रुचकर, स्निग्ध, पुष्टिकर, कांतिवर्घक

हे गुण पाहिले असता लक्षात येते की दही जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे की त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही. दह्यातील इतर गुण मात्र वृद्धिंगत होतात

- डॉ. श्री. बालाजी तांबे

balaji on April 20th, 2009
जीवनदायी रक्‍त

Friday, April 17th, 2009 AT 9:04 AM

जलांश म्हणजे जीवन हा जगातल्या प्रत्येक घटकाला लागू असणारा न्याय लक्षात घेतला तर, रक्त हे आपल्या जीवनाशी इतके निगडित का हे लक्षात येऊ शकते. रक्तात निर्माण झालेले दोष शरीरावर विविध प्रकारे व्यक्त होतात. म्हणून मुळात रक्तातच दोष निर्माण होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जायला हवी.

पुराणांतरी अशी गोष्ट सापडते की युद्धात एका राक्षसाचा वध करणे खूप अवघड होते कारण युद्ध करते वेळी जमिनीवर पडलेल्या त्याच्या रक्‍ताच्या प्रत्येक थेंबापासून पुन्हा राक्षस उत्पन्न होत असे. पुराणातील असा राक्षस दूषित रक्‍ताचा, कुठल्यातरी व्हायरसचा निदर्शक असतो. शुद्ध रक्‍त म्हणजेच जीवन व रक्‍तामुळेच जीवनातील आनंद असतो. माणसा-माणसातील स्नेह ह्या ओलाव्यामुळेच असतो. रक्‍त दूषित होणे म्हणजेच ओलावा कमी होणे.

“प्रयत्ने वाळूचे कणही रगडिता तेलही गळे” असे म्हणायची वेळ का येते तर वाळू एवढी कोरडी असते की त्यात जलांश वा तेलांश असूच शकत नाही. पण म्हणतात की खूप प्रयत्न केले तर कदाचित वाळूतूनही तेल निघणे शक्‍य आहे. वाळूतील तेल काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल हा संदेश या म्हणीतून आपल्याला मिळतो. तात्पर्य काय तर कणाकणात ओलावा असावाच लागतो. लाकडात ओलसरपणा असेपर्यंत ते जिवंत असते, त्यातला ओलसरपणा एका मर्यादेपेक्षा कमी झाला की ते निर्जीव होते, त्याचा भुगा होतो, त्याचे कण वाऱ्यावर उडून जातात व त्याचे आयुष्य संपते.

वस्तूचा जिवंतपणा त्यातील जलांशावर वा तेलांशावर अवलंबून असल्याने तोच अंश काढून घेतल्यास वस्तूचा आकार तसाच राहिला तरी त्या वस्तूत काही तथ्य राहिलेले नसते.

आयुर्वेदाने अन्नाच्या परिवर्तनानंतरच्या धातू - स्निग्धांशाला वीर्य असे संबोधले. म्हणून एखाद्या वस्तूत वीर्य किती आहे त्यानुसार त्या वस्तूची किंमत ठरते. सध्या लवंगा, वेलची अशा महागड्या वस्तू त्यातील तेल काढून घेऊन नंतर स्वस्तात विकल्या जातात. अशा वस्तू वापरून, “मी शिऱ्यात वेलची टाकली’ अशा समाधानापेक्षा अन्य काही उपयोग होत नाही. अशा वेलचीला वास येत असला तर त्या वेलचीला रासायनिक द्रव्य लावले आहे, असे समजायला हरकत नाही.

प्रत्येक वस्तूतला जलांश हेच त्या वस्तूचे जीवन असते. तसेच, मनुष्याच्या शरीरातील रक्‍त हेच त्याचे जीवन असते. रक्‍त बाहेर बनविता येत नाही. ते वाळविताही येत नाही. वाळण्याची सुरुवातीची क्रिया म्हणजे ते थोडेसे घट्ट झाले तरी हृदयात वा मेंदूत अवरोध उत्पन्न होऊन हृदयाघात वा पक्षाघाताचा झटका आलेला दिसतो. रक्‍त शरीरात असताना त्याचा एक विशिष्ट पातळपणा असणे आवश्‍यक असते, त्यातील सर्व द्रव्ये विशिष्ट प्रमाणात असावी लागतात व प्रत्येक पेशीला रक्‍तातूनच जीवन मिळते. माया पातळ झाली तर व्यवहारात नातेसंबंध बिघडतात.

रक्‍त अति पातळ होऊ लागले तर जखम झाली असता रक्‍त वाहून जाईल व आंतरेंद्रियांना आवश्‍यक त्या प्रमाणात रक्‍तपुरवठा होणार नाही. म्हणूनच हिमोफिलिया या रोगाची मोठी भीती वाटते. पण या रोगाशी लढण्यासाठी जन्मपूर्व प्रयत्न, गर्भसंस्कार व नैतिक वागणूक यांची आवश्‍यकता असते आणि तरच औषधोपचार यशस्वी होतात.

शरीरात रक्‍त भरपूर आहे किंवा नाही याचा अंदाज बोटाचे नख दाबून घेतला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत बोट दाबले की तेवढा भाग पांढरट दिसतो कारण त्यातला जलांश दूर सरकतो तसेच नख दाबल्यावर प्रथम तेथील रक्‍त बाजूला सरून तेथील नख पांढरट दिसते व नखावरचा दाब काढल्यावर तेथे रक्‍तप्रवाह जलद गतीने येऊन नख लाल दिसते.

केसांमध्ये जोपर्यंत जीवांश किंवा तेलांश आहे तोपर्यंत केसांना चकाकी असते. अशा वेळी वरून लावलेले तेल उपयोगी पडते व ते नीट बसतात. शरीराच्या मुख्य भागांनाच जेव्हा जीवनसत्त्वे मिळणे दुरापास्त होते तेव्हा केसांना बिचाऱ्यांना रक्‍त कोठून मिळणार? अशा वेळी केस पांढरेफटक पडून वाऱ्यावर भुरभुरू लागले वा गळू लागले तर नवल नाही. तेव्हा केस गळण्याची तक्रार असल्यास फक्‍त केसांना तेल लावून उपयोग नसतो. तर, शरीरातील रक्‍ताकडेही लक्ष द्यावे लागते. केस पांढरे होणे या तक्रारीवर उपाय करायचा असला तर रक्‍तावर उपचार करून नंतरच केसांवर उपचार करणे आवश्‍यक असते. शरीरात रक्‍त कमी असले की ताकद राहात नाही, धाप लागते, त्वचा काळपट, पांढरट वा राखाडी म्हणजे जीवन नसलेली दिसू लागते.

रक्‍त हेच जीवनाचे सर्वस्व असल्याने व्यक्‍ती कुठल्या रक्‍ताची आहे, व्यक्‍ती राजघराण्यातील रक्‍ताची आहे का? असे पाहिले जाते. यावरून लक्षात येते की रक्‍तसंबंध हाच शेवटी महत्त्वाचा असतो. युद्धात शत्रूचे रक्‍त सांडणे किंवा रक्‍तशुद्धी, रक्‍ताचे नाते या गोष्टी नेहमी बोलण्यात असतात व यावरूनही रक्‍ताचे महत्त्व लक्षात येते.

शरीरात रक्‍त भरपूर प्रमाणात असले तरी त्यात काही दोष असतात असेही बरेच वेळा असे दिसते. जसे पाणी उघडे ठेवले तर वरून कीडा-मुंगी पडून पाणी दूषित होईल हे तर वेगळेच पण त्यात वातावरणातील धुळीचे बारीक कण मिसळून जातात काही वेळाने त्यात दोष उत्पन्न होतो. त्याचप्रमाणे शरीरावर कुठेही बाह्यवातावरणाशी संबंध येईल अशी उघडी जखम असल्यास खूप काळजी घ्यावी लागते. कारण, अशा उघड्या जखमेद्वारे बाह्यवातावरणातील जंतुसंसर्ग वा व्हायरससंसर्ग होऊ शकतो. या गोष्टीवर आधारित स्त्रियांच्या मासिक धर्माच्या वेळचे काही नियम केलेले दिसतात.

रक्‍ताची शुद्धता सांभाळणे खूप महत्त्वाचे असते. सेवन केलेल्या अन्नापासूनच रक्‍त तयार होत असल्याने अन्न-पाण्याची शुद्धी पाळणे हे रक्‍त शुद्ध ठेवण्याचा एक सोपा व प्रभावी मार्ग असतो. मसालेदार, अति तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ सेवन केल्यास रक्‍तात पित्तदोष उत्पन्न होऊन त्वचा लाल होणे, त्वचेवर गांधी वा पुटकुळ्या उठणे असे त्रास सुरू होतात. फुप्फुसात वा रक्‍तात मोठा दोष उत्पन्न झाला तर एक्‍झिमा, त्वचारोग, सोरायसिस असे रोगही झालेले दिसतात. डोक्‍यात कोंडा होणे, अंगावर कंड सुटणे, अंगावर सुई टोचण्यासारखे वाटणे असे सर्व त्रास झालेले दिसतात. रक्‍तातील बरेचसे दोष काही प्रमाणात तरी बरे करता येतात. तसेच ऍनिमिया म्हणजे रक्‍त कमी प्रमाणात असणे या रोगाचाही इलाज करणे सोपे असते,

सध्या खाण्यापिण्यावर काही निर्बंध राहिलेले नसल्यामुळे व आहारशास्त्राबाबतीत चुकीचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे बहुतेक ठिकाणी रक्‍तदोष घेऊनच मुले जन्माला आलेली दिसतात. त्वचेवर फोड, लालसरपणा याद्वारे रक्‍तदोष साधारणपणे प्रकट होतो पण रक्‍तदोष अधिक प्रमाणात असल्यास श्‍वसनाचे विकारही झालेले दिसतात. रक्‍तातील दोषामुळेच त्वचा काळवंडते हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून सौंदर्य वाढविण्याची वा रंग उजळ व्हावा व चेहरा तेजःपुंज दिसावा अशी इच्छा असल्यास औषधयोजना करण्याचे काम रक्‍ताच्या माध्यमातून अत्यंत सोपेपणाने होऊ शकते.

- डॉ. श्री. बालाजी तांबे

balaji on April 11th, 2009
“भाऊराव, अहो भाऊराव!” या हाकांनी भाऊराव शिंदेंना जाग आली. भाऊराव हे पडेगावचे शेतकरी. सुपीक जमीन, भरपूर पाणी. दुपारचं काम संपवून भाऊराव आंब्याच्या झाडाखाली झोपले होते. जाग येऊन बघतात, तर घरातला दत्ता गडी.

“भाऊराव, लगेच चला; आपली सोनाली बेशुद्ध झाली आहे. “काय? असं कसं झालं?” असं म्हणत ते उठले व मोटरसायकलला किक मारली.

सोनाली शिंदे ही भाऊरावांची थोरली सुकन्या. नुकतीच बी.एस.सी. झालेली. नेहमीप्रमाणे कॉलेजातून घरी आली आणि तिचं डोकं दुखायला लागलं, चक्कर आल्यासारखी वाटली आणि थोड्याच वेळात ती बेशुद्ध झाली. या घटना इतक्‍या थोड्या वेळात घडल्या, की दत्ता एकदमच घाबरून गेला.

“भाऊराव, तुम्हाला ताबडतोब सोनालीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे. ती पूर्णपणे बेशुद्ध आहे आणि मेंदूचा आजार वाटतो आहे.” डॉक्‍टर सांगत होते. “मी मेंदूची सूज कमी करण्याची औषधे दिलेली आहेत. पण, तिच्यावर तातडीनं उपचार व्हायला हवेत.” ते म्हणाले.

सोनालीला ताबडतोब ऍम्ब्युलन्समधून पुण्याला हलवण्यात आले. तेथे तिचा मेंदूचा सीटी स्कॅन करण्यात आला. सीटी स्कॅनमधून तिला आयसीयूमध्ये हलविण्यात आले. तेथे मात्र थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली.

“भाऊराव, सोनालीला मेंदूमध्ये अगदी आतल्या भागात एक गाठ आहे. गाठ म्हटल्यावर घाबरून जाऊ नका. कारण ही अगदी साध्या प्रकारची गाठ आहे. फक्त ती अगदी विचित्र ठिकाणी बसलेली आहे.”

“डॉक्‍टर, मला नेमकं कळलं नाही!”

“भाऊराव, या गाठीला इंग्रजीत “कोलॉइड सिस्ट’ म्हणतात. या गाठीत पांढरट पिवळा द्राव भरलेला असतो, कच्चा अंड्यातला पांढरा भाग जसा असतो, तशा प्रकारचा हा द्राव असतो. कधीकधी मात्र, या द्रावाची घनता वाढलेली आढळते. ही गाठ साधारण आवळ्याच्या आकाराची असते. अर्थात हा आवळा लहान, मध्यम किंवा मोठा कोणताही असू शकतो. सोनालीची गाठ ही मोठ्या आवळ्याच्या आकाराची आहे. ती नेहमीपेक्षा मोठी आणि मागच्या भागात आहे. आपण ताबडतोब शस्रक्रया करून ही काढण्याची गरज आहे.”

सोनालीचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. मायक्रोस्कोपच्या साह्याने ही गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात आली. सोनाली दुसऱ्याच दिवशी उठून बसली व चालू फिरू लागली.

“डॉक्‍टर, आम्ही खेड्यातली माणसं. पण सोनालीला नेमकं काय झालं होतं हे सांगू शकाल का?” भाऊरावांचा लहान भाऊ विकास डॉक्‍टरांना विचारत होता.

“विकास, खेड्यातील काय किंवा शहरातील काय, माणसाच्या आजाराविषयी पूर्ण ज्ञान करून घेण्याचा आपल्याला हक्क आहे. “तुम्ही देव!” असं म्हणून डॉक्‍टरांना भगवानपदावर पोचवायचे व आपण फक्त बघत राहायचे, ही वृत्ती सोडण्याची गरज आहे. मी तुला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो.”

कोलॉइड सिस्ट म्हणजे काय?

आपला मेंदू हा “सीएसएफ” नावाच्या पाण्यासारख्या द्रवात तरंगत असतो. (सीएसएफ म्हणजे “सेरेब्रोस्पायनल फ्लुइड” म्हणजेच “मेंदू आणि मज्जारज्जूचे पाणी”). आपल्या मेंदूच्या आत हे पाणी तयार होण्याची यंत्रणा असते. तिला व्हेंट्रिक्‍युलर सिस्टिम असे म्हणतात. यात एकूण चार कप्पे असतात. दोन मोठ्या पोकळ्या (लॅटरल व्हेंट्रिकल) या पोकळ्यातून एका चिंचोळ्या खिंडीसारख्या मार्गातून हे पाणी तिसऱ्या पोकळीत जाते व तेथून परत एका अरुंद मार्गाने चौथ्या पोकळीत जाते. तेथून ते मेंदूच्या बाहेर पडून मेंदू व मज्जारज्जूभोवती फिरते व परत रक्तात शोषले जाते. या पोकळ्यांमध्ये हे पाणी सारखेच तयार होत असते व त्याचे अभिसरणही चालू असते.

आता कल्पना करा, तुमच्या शेतातल्या कालव्यामधून पाणी वाहत जाते, त्यात अचानक बांध घातला तर काय होईल? “”बांधाच्या अलीकडे पाणी साचत जाऊन मोठे तळे तयार होईल,” विकास म्हणाला.
“बरोबर! सोनालीच्या मेंदूतील गाठ ही, पहिल्या दोन पोकळ्यांतून पाणी ज्या खिंडीतून तिसऱ्या पोकळीत जाते, तिथे बसलेली होती. सोडावॉटरच्या बाटलीची गोटी जशी बाटलीच्या तोंडात अडकून बसते, त्याप्रमाणे ही गाठ त्या खिंडीत अडकून बसली होती. जेव्हा ही गाठ अडकली, त्या वेळी मोठ्या पोकळीतील पाण्याचा दाब प्रचंड प्रमाणात वाढला आणि ती बेशुद्ध झाली. ही स्थिती तशीच राहिली, तर प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो. कारण “बांधाच्या’ अलीकडच्या पाण्याची पातळी वाढतच जाते. म्हणूनच ही गाठ तातडीने काढावी लागते. ही गाठ अगदी साध्या प्रकारची असल्याने एकदा पूर्णपणे काढल्यावर परत उद्‌भवत नाही; मात्र तिचे निदान योग्य वेळी होणे महत्त्वाचे असते.
डॉ. जयदेव पंचवाघ, चेताशल्यविशारद, पुणे
balaji on April 8th, 2009
आयुर्वेद हे फक्‍त रोग बरा करणारे वैद्यकशास्त्र नाही तर ते एक जीवनाभिमुख शास्त्र आहे, याचा ग्रंथ वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. कसे वागावे, काय करू नये यासंबंधी सद्‌वृत्त विभागात अतिशय मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते.

सद्‌वृत्तामध्ये काय काय करू नये हे जे सांगितले त्यात पहिली गोष्ट सांगितली, “नानृतं ब्रूयात्‌”‘ म्हणजे असत्य बोलू नये.

मनुष्याला तीन स्वाभाविक इच्छा असतात. प्राणैषणा, धनैषणा आणि परलोकैषणा.

प्राणैषणा म्हणजे प्राणांचे रक्षण करण्याची इच्छा

धनैषणा म्हणजे उपजीविका चालण्यासाठी आवश्‍यक असणारे धन मिळविण्याची इच्छा

परलोकैषणा म्हणजे मृत्यूनंतर परलोकात चांगले स्थान मिळविण्याची इच्छा

आयुर्वेदात या तीन एषणा नुसत्याच समजावल्या असे नाही तर त्या पूर्ण होण्यासाठीही मार्गदर्शन केलेले आहे. चरकसंहितेतल्या या सूत्रावरून हे स्पष्ट होते.

इमांस्तु धारयेद्वेगान्‌ हितार्थी प्रेत्य चेह च ।

साहसानाम्‌ अशस्तानां मनोवाक्काय कर्मणाम्‌ ।।

… चरक सूत्रस्थान

जिवंत असताना तसेच मृत्यूनंतर परलोकातही स्वतःचे हित हवे असणाऱ्या व्यक्‍तीने अयोग्य, अत्यंत साहसयुक्‍त तसेच मन, वाणी व शरीरासाठी निंदित असणाऱ्या वेगांचे धारण करावे. यात वाणीसाठी निंदित असणाऱ्या वेगांमध्ये “खोटे बोलण्या”चा समावेश केलेला आहे. बरोबरीने अत्यंत कठोर वचन बोलणे, चहाड्या करणे व वेळेचे तारतम्य न ठेवता बोलणे याही गोष्टी निंद्य सांगितल्या आहेत.

आयुर्वेदाने काया, वाचा, मन या तिन्ही स्तरांवर याप्रकारे काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन करण्याने मनुष्याचे मन, वचन व कर्म यांची शुद्धी झाली की सुखपूर्वक धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ साध्य करून तो फळांचा उपभोग घेऊ शकतो व आरोग्याचा आनंद घेऊ शकतो. खरे बोलणे हे केवळ सज्जनतेचे नव्हे तर आरोग्याचेही कारण असते हे यावरून लक्षात येते.

असत्य बोलणे हा एक प्रकारचा प्रज्ञापराधच असतो. बुद्धी, संयमन शक्‍ती आणि स्मरणशक्‍ती या तिघांचा परस्परात समन्वय असला आणि त्या आपापले काम व्यवस्थित करत असल्या की मनुष्य योग्य निर्णय घेतो आणि त्यामुळे आरोग्याचे रक्षण होते. मनुष्य असत्य बोलतो म्हणजेच वास्तविकतेपेक्षा काहीतरी वेगळे बोलत असतो.

अर्थातच सत्य काय हे बुद्धीला माहीत असले तरी ती भ्रष्ट झाल्याने काहीतरी वेगळे बोलायला, करायला भाग पाडते. यात संयमन होऊ शकलेले नसते आणि यातूनच वास्तविकतेपेक्षा निराळा निर्णय बुद्धीने घेतला की प्रज्ञापराध घडतो आणि प्रज्ञापराध हे अनेक रोगांचे कारण असल्याने त्यातून अनेक रोग निर्माण होतात.

अशा प्रकारे “सत्य’ सद्‌वृताच्या दृष्टिकोनातून जितके महत्त्वाचे असते तितकेच आरोग्यरक्षणासाठीही आवश्‍यक असते.

खराब पाणी प्यायल्याने जसा लगेच त्रास होतो तसा असत्य बोलण्याचा दुष्परिणाम लगेचच दिसेल असे नाही. मात्र, प्रज्ञा भ्रष्ट होणे हे खराब पाणी पिण्याने होणाऱ्या त्रासापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरू शकते.

योग, ज्योतिष, संगीत, अध्यात्म अशी अनेक भारतीय शास्त्रे आहेत. या प्रत्येक शास्त्राचा मुख्य विषय निरनिराळा असला तरी “मोक्षप्राप्ती’ हेच त्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे. आयुर्वेदही याला अपवाद नाही. आयुर्वेदात मोक्षप्रकरण नावाचे वेगळे प्रकरण दिलेले आहे. यात सांगितले आहे,

शुद्धसत्त्वस्य या शुद्धा सत्या बुद्धिः प्रवर्तते ।

… चरक शारीरस्थान

शुद्ध मन असणाऱ्या व्यक्‍तीच्या ठिकाणी जी शुद्ध बुद्धी प्रकट होते तिला “सत्याबुद्धी’ म्हणतात. ज्या सत्याबुद्धीच्या बलावर अतिबलवान अंधकाररूपी तमाचे, मायेचे भेदन करणे शक्‍य होते; ज्या सत्याबुद्धीमुळे मनुष्य निःस्पृह बनतो व अहंकारापासून मोकळा होऊ शकतो; ज्या सत्याबुद्धीमुळे योगाची सिद्धी होते व तत्त्वज्ञान संपन्न होते; ज्या सत्याबुद्धीमुळे जन्म-मरणाच्या चक्राला कारण ठरणाऱ्या गोष्टींपासून मनुष्य दूर राहू शकतो; ज्या सत्याबुद्धीमुळे मनुष्य सर्व इच्छांचा, वासनांचा त्याग करू शकतो व “अक्षरब्रह्म” प्राप्त करू शकतो या सत्याबुद्धीलाच सिद्धी, प्रज्ञा, ज्ञान असे म्हणतात.

अर्थात मनाची शुद्धी सहजासहजी होत नसते.

कर्मयोग, भक्‍तियोग, सद्‌गुरुंचे आशीर्वाद वगैरे अनेक गोष्टींमुळे मन शुद्ध होत असते. सत्यवचन आणि असत्याचा त्याग ही त्याची पूर्वतयारी होय.

थोडक्‍यात सर्वांगीण आरोग्यासाठी, सामाजिक स्वस्थतेसाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी सत्याचा अवलंब करणे श्रेयस्कर होय.

- डॉ. श्री बालाजी तांबे

रक्‍तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी गोळ्याही चालू आहेत; मात्र चालताना माझे पाय लाकडासारखे कडक होतात व दुखतात, त्यामुळे चालता येत नाही. बसल्याशिवाय बरे वाटत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- परशुराम गुरव, सिंधुदुर्ग
उत्तर - चालताना याप्रमाणे त्रास होणे हे रक्‍ताभिसरण पुरेशा प्रमाणात होत नसल्याचे लक्षण आहे, त्यामुळे गोळ्यांच्या मदतीने रक्‍तदाब नियंत्रणाखाली राहात असला तरी रक्‍ताभिसरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. यासाठी संपूर्ण शरीराला, विशेषतः पायांना खालून वर या दिशेने हलक्‍या हाताने अभ्यंग करणे उत्तम.
वातदोषाचे संतुलन करणाऱ्या व रक्‍ताभिसरण सुधारण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांनी सिद्ध “संतुलन अभ्यंग तेल” यासाठी उत्तम होय. बरोबरीने “कार्डिसॅन”सारखे चूर्ण मधाबरोबर घेण्याचाही चांगला उपयोग होईल. सोबत “संतुलन वातबल”, “संतुलन रुधरा” वगैरे योग घेण्याचाही फायदा होईल. योग्य रक्‍ताभिसरणावर सर्व शरीरव्यापार अवलंबून असल्याने वेळेवर योग्य उपचार अवश्‍य सुरू करावेत. शास्त्रोक्‍त पद्धतीने पंचकर्म करणेही महत्त्वाचे होय.
प्रश्‍न - माझ्या दोन्ही डोळ्यांवर टेरिजियम म्हणजे पांढरट पडद्यासारखे वाढते आहे. एकदा ऑपरेशन झाले आहे तरीही पुन्हा वाढते आहे. कृपया कमी होण्यासाठी व पुन्हा वाढू नये यासाठी मार्गदर्शन करावे.
- श्री. मनोहर, पुणे
उत्तर - ऑपरेशन करूनही या प्रकारचा त्रास वारंवार होतो हा अनेकांचा अनुभव असतो. असा त्रास पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी अवश्‍य प्रयत्न करता येतात तसेच पडदा वाढण्यास नुकतीच सुरुवात आली असली तरी शस्त्रकर्म टाळता येऊ शकते. डोळ्यात नियमित अंजन उदा. “सॅन अंजन (क्‍लिअर)”टाकणे, रात्री झोपताना डोळ्यात “संतुलन सुनयन तेला”सारखे डोळ्यांचे आरोग्य कायम राहण्यास मदत करणारे तेल टाकणे हे उपाय करता येतात. तसेच रोज सकाळी त्रिफळ्याच्या काढ्याने डोळे धुण्याचाही उपयोग होऊ शकतो.

डोळ्यांचे आरोग्य कायम राहावे व टेरिजियम सारखा त्रास वारंवार होऊ नये यासाठी हे सर्व उपाय उत्तम होत. बरोबरीने पोटात घेण्यासाठी औषधांची गरज दिसते, त्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
प्रश्‍न - मी 37 वर्षांची आहे. माझी पाठ, कंबर, खांदे व सर्वच सांधे खूप दुखतात. लहानपणी मला संधिवाताचा त्रास झाला होता. त्या वेळी सात-आठ वर्षे मी महिन्याला एक याप्रमाणे खूप इंजेक्‍शने घेतली होती. सध्या कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत पण खूप वय झाल्यासारखा थकवा येतो. हालचाल करू नये असे वाटते. जागरणे तर मुळीच सहन होत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे.
- सोनाली मोरे, चिंचवड
उत्तर - लहानपणापासून असंतुलित झालेल्या वातदोषामुळे इतका त्रास होतो आहे. वातसंतुलनासाठी तसेच ताकद वाढविण्यासाठी संपूर्ण शरीराला “संतुलन अभ्यंग तेल” व सांध्यांना “संतुलन शांती तेल” लावण्याचा उपयोग होईल. नियमितपणे पादाभ्यंग करण्यानेही वात संतुलनास मदत मिळू शकते. बरोबरीने “संतुलन वातबल गोळ्या’ “संतुलन प्रशांत चूर्ण”, “कॅल्सिसॅन गोळ्या” घेण्याचा उपयोग होईल. चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकून तयार केलेली गरम गरम पोळी वा भाकरी दिवसातून एकदा खाण्याचा तसेच रोज सकाळी नाश्‍त्यापूर्वी सुंठ-गूळ-तुपाची सुपारीच्या आकाराची गोळी घेण्याचाही उपयोग होईल.
कॅल्शियम मिळण्याच्या दृष्टीने आहारात दूध व साजूक तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश असण्याकडे लक्ष ठेवावे. बऱ्याच वर्षांपासून व बराच तीव्र त्रास आहे त्यादृष्टीने तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्मातील विरेचन, बस्ती करून क्षीरबस्ती, पिंडतैलबस्ती वगैरे घेणेही श्रेयस्कर होय.
प्रश्‍न - माझे वय 46 वर्षे असून, वर्ण सावळा आहे; पण चेहरा रापल्यासारखा काळा वाटतो. विशेषतः कपाळावर भुवयांवर काळसर तवंग असल्यासारखा दिसतो. उन्हात जावे लागले नाही, तरी चेहरा काळवंडलेला असतो. नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे.
- शरद जोशी, पुणे
उत्तर -
शरीरात अशुद्धी साठायला लागली की काही विशिष्ट ठिकाणची त्वचा काळवंडू लागते, भुवयांच्या वरचा काळसरपणा हा यामुळेच आलेला आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन व बस्ती घेणे. एरवीसुद्धा पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवायला हवे.
दर 15 दिवसांनी एरंडेल तेल किंवा योगसारक चूर्ण घेऊन दोन-तीन जुलाब होऊ देण्याचाही उपयोग होईल. या उपायांनी आंतरशुद्धी होणे सर्वात आवश्‍यक असून बरोबरीने “संतुलन रोझ ब्युटी तेला”सारखे वर्ण्य तेल लावण्याचा, “सॅन मसाज पावडरने’ चेहरा धुण्याचाही फायदा होईल. महामंजिष्ठादि काढा, मंजिष्ठासॅन गोळ्या घेणेही चांगले होय.
- डॉ. श्री बालाजी तांबे

वयाच्या सतराव्या वर्षी 1967 साली पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे नसिमा हुरजूक यांचे कंबरेपासून खालचे शरीर लुळे पडले. हा मोठा आघात धीराने पचवून त्यांनी शिक्षण सुरू ठेवले आणि 1973 मध्ये शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पदवी मिळविली.

1977 मध्ये त्यांना केंद्रीय अबकारी व सीमाशुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात नोकरी मिळाली. तिथे कार्यरत असतानाच 1983 मध्ये त्यांनी “हेल्पर्स ऑफ द हॅंडिकॅप्ड’ या सार्वजनिक विश्‍वस्त न्यासाची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून आजवर सात हजार अपंगांना सुमारे दीड कोटी रुपयांच्या मोलाची मदत सेवा पुरविण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील कान्हे येथील अति अपंगांसाठीचे वसतिगृह, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्ननगरी हे अपंग आणि निराधार वृद्धांसाठीचे वसतिगृह, समर्थ विद्यामंदिर ही कोल्हापूर येथील मिश्र प्राथमिक शाळा, अपंगांकडून चालविले जाणारे लाजवाब फिरते उपाहारगृह असे अपंगांना आधार देणारे प्रकल्प त्यांनी उभे केले आहेत.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असं संत तुकाराम महाराज म्हणून गेलेत. त्यांना अभिप्रेत असलेलं युद्ध मनाशी चाललेलं चांगल्या-वाईटातलं युद्ध आहे. पण, अपंगत्व नशिबी आलेल्या प्रत्येकाला युद्धाच्या प्रसंगाला सतत तोंड द्यावं लागतं ते वेगळ्या अर्थानं. हे युद्ध वेगवेगळ्या पातळ्यांवरचं असतं. शरीर पांगळं बनलेलं असतं. त्यामुळं त्याच्या मर्यादा ओलांडून जाणं ही मोठीच लढाई असते. ती सतत लढत राहावी लागते. या लढाईसाठी कुटुंबीय, डॉक्‍टर मंडळी अशा सर्वांचं साहाय्य लागतं. वैद्यकशास्त्रातल्या प्रगतीमुळं आता ही लढाई सोपीही व्हायला लागली आहे. पण, ती लढायची असते त्या व्यक्तीला स्वतःची स्वतःलाच. जोपर्यंत अपंगत्व आलेल्या व्यक्तीचा निर्धार पक्का असेल तर कुटुंबीयांनी, डॉक्‍टर मंडळींनी केलेल्या प्रयत्नांना लवकर आणि भरपूर यश येण्याची शक्‍यता वाढते.

त्यानंतरची लढाई असते ती मनाची लढाई. “हे सारं आपल्याच वाट्याला का आलं?’ हा प्रश्‍न अस्वस्थ करीतच असतो. त्यामुळं नकारात्मक भावना वाढायला लागतात. जीव नको, जगणंच नको, असं वाटू लागतं. या अवस्थेतून बाहेर येण्यासाठीची लढाई लढावी लागते तीही त्या-त्या व्यक्तीला स्वतःलाच. यासाठी बाहेरून, अन्य कोणाकडून काही मदत मिळेल अशी शक्‍यता आपल्या समाजात आजच्या घडीलाही कमीच आहे. “मी उपयुक्त आहे’ ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण व्हावी लागते. अशी भावना निर्माण झाली की ही लढाई जिंकली असं म्हणता येईल.

त्यापुढं तिसरी लढाई असते समाजात वावरताना करावी लागणारी. कुठं जायचं म्हटलं तर, अपंगांना काय सोयीचं होईल याचा विचार क्वचितच केलेला दिसतो. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकारी यंत्रणा साह्यभूत होताना क्वचितच दिसते. अपंगांबाबतही तिचं धोरण बदलत नाही. त्यामुळं ही लढाई प्रत्येकाला लढावीच लागते. रुग्णालयातून घरी पाठविताना अपंगांना चाकाच्या खुर्च्या दिल्या जाव्यात, ही साधी अपेक्षा आपल्याकडे कित्येक वर्षं पूर्ण केली जात नाहीये. मग, त्यांना स्वावलंबन शिकवून पाठवणं तर दूरच. प्रत्येक रुग्णालयाला जोडून अपंगांसाठी एक पुनर्वसन केंद्र असायला हवं. “आपण उपयुक्त आहोत’ ही भावना अपंगांमध्ये प्रभावीपणं निर्माण केली जायला हवी. उपचारांच्या पहिल्या टप्प्यातच हे उत्तमप्रकारे होऊ शकतं. पण, दुर्दैवानं आपल्याकडं ते अद्यापही होत नाही.

माझ्या वयाच्या सोळाव्या वर्षी साधं पाठदुखीचं निमित्य झालं. डॉक्‍टरांना नीट निदान झालं नाही.

पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती आणि अचानक माझे दोन्ही पाय लुळे पडले. ज्या वयात आयुष्याचा अर्थ आकाराला येऊ लागतो त्याच वयात हा आघात झाला. मी आंतर्बाह्य उन्मळून पडले होते. त्यातच माझे वडील पैगंबरवासी झाले. कमालीचं नैराश्‍य आलं. मी बिछान्याला खिळून असे. भोवताली काळाकुट्ट अंधारच होता. अशा अवस्थेत बंगळूरच्या “असोसिएशन ऑफ फिजिकली हॅन्डिकॅप्ड” या संस्थेचे बाबूकाका दिवाण यांची भेट झाली आणि माझा दृष्टिकोनच बदलून गेला.

मला जीवनाचं ध्येय मिळालं. बाबूकाकांसारखंच अपंगांच्या सेवेला वाहून घ्यायचं मी ठरवून टाकलं.

जीवनाचं ध्येय एकदा ठरलं की त्या दिशेनं वाटचाल आपोआप सुरू होते. त्या काळात मला कुशीवर वळणंही शक्‍य होत नसे. पण, मग आपण काय गमावलंय, आपल्याकडचं काय गेलंय यापेक्षा आपल्याकडे अजूनही काय शाबूत आहे याचा विचार मी करू लागले. मला लक्षात आलं की मी विचार करू शकते. माझे हात धडधाकट आहेत. त्यांचा वापर मी अनेक गोष्टींसाठी करू शकते. आणि मग मी काम सुरू केलं. हळूहळू माझं शिक्षण पूर्ण केलं. नोकरी धरली. अर्थात आज इथे लिहितांना जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं ते कधीच नव्हतं. अनेकवार मनात झगडा सुरू व्हायचा.

“मीच का हा त्रास सहन करायचा?’ “हे सारं माझ्याच वाट्याला का आलंय?” यापेक्षा मरण बरं, असं वाटत राहायचं. पण, हळूहळू अशा नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक विचार करण्याची सवय घालून घेतली.

दरम्यानच्या काळात इतरांसाठीही काम करायला सुरवात झाली होती. आपले हात तरी धडधाकट आहेत. ज्यांचे हातही कमकुवत आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, असं मी ठरवलं. अर्थात, आपल्या स्वतःच्या अडचणी विसरून इतरांसाठीच्या कामात गुंतणंही कठीणच होतं. हळूहळू सवयीनं ते ही अंगवळणी पडत गेलं. इतर अनेकांची साथ मिळाली आणि काम वाढतच गेलं. पण, हे झालं म्हणजे लढाई संपली असं होत नाही. ती चालूच राहते.

“पॅराप्लेजिया” म्हणजे लुळेपणा हा सोबत अनेक व्याधी घेऊन येतो. सतत अंथरुणावर पडून राहावं लागल्यानं पाठीला जखमा (बेड सोअर्स) होतात. अनेकदा लघवी, शौचासारख्या क्रियांवरचा ताबाच निघून जातो. अशावेळी रुग्ण आणि त्यांची सेवा करणारे कुटुंबीय अशा दोघांच्याही परीक्षेचाच काळ असतो. मलाही या साऱ्यातून जावं लागलं. त्यात भरीला स्पॉन्डिलायसिस, रक्तदाब, मधुमेह, मूळव्याध अशा व्याधींची भरच पडत गेली. म्हणजे एका लढाईनंतर लगेच दुसऱ्या लढाईसाठी सज्ज राहणं भाग असतं. हे करण्याचा एकच उत्तम मार्ग मला माहितीये तो म्हणजे स्वतःला कामात गुंतवून घेणं.

सध्या मी सिंधुदुर्गात स्वप्ननगरीमध्ये असते. मला पहाटे अगदी लवकर जाग येते. जाग आल्यावर, पहिल्याप्रथम रात्रभर अंगाखाली राहिल्यानं लघवीचा वास येत असलेल्या बेडशीटस्‌ वॉशिंग मशिनमध्ये टाकून धुणं आणि अस्वस्थ करणारा वास घालवणं हेच माझं पहिलं काम असतं. स्वच्छ होऊन मग संगणकावर काम करायला सुरवात करायची. आदल्या दिवसभरात आलेल्या फाइल्स पाहणं, निर्णय घेणं, त्यानुसार शेरे देणं हे सारं पहाटेच्या त्या शांत वेळी भराभर होत जातं. तोपर्यंत वसतिगृहातल्या मुलांची उठण्याची वेळ होत आलेली असते. मग तिकडे फेरी होते. मला मदत करणाऱ्यांची झोपही तेव्हा पूर्ण झालेली असते.

स्पॉन्डिलोसिसमुळे माझ्या हातातली ताकदही आता जात चालली आहे. त्यामुळे अंघोळीसाठीही आता मला इतरांवर अवलंबून राहावं लागतं. वसतिगृहातल्या फेरीनंतर अंघोळ आणि न्याहारी. मग स्वावलंबनाच्या प्रशक्षणासाठी सुरू केलेल्या प्रोसेसिंग युनिटस्‌कडे फेरी होते. अशी सकाळी दहा-साडेदहापर्यंत माझी महत्त्वाची कामं संपलेली असतात. मग बेडवर पडल्यापडल्या विणकाम, वाचन, कधी व्हीलचेअरवर बसून शिलाई मशिनवर काम अशी कामं चाललेली असतात. हे संध्याकाळी चार पर्यंत चालू असतं. ती वसतिगृहातल्या मुलांची परत येण्याची वेळ असते. मग, खाणं-पिणं होऊन त्यांच्यासोबत सूर्यास्त पाहायला गच्चीवर जायचं हा एक कार्यक्रमच असतो. संध्याकाळच्या त्या वेळी निसर्गाची ती बदलती रूपं पाहिल्यावर सारी दुखणी पळून जातात.

अर्थात, असं जगणं प्रत्येकालाच शक्‍य होईल असं नाही. अनेकांना रात्री झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. पण, दिवसभरात नीट नियोजनपूर्वक श्रम केले तर रात्री शांत झोप येतेच, असं माझं म्हणणं असतं. आव्हानं भरपूर आहेत. पण, आशेचे किरणही दिसत असतात. म्हणूनच, एक सातत्याने करत राहायचं. आपली लढाई सतत लढत राहायचं. मनात लढाई, घरात लढाई, घराबाहेर लढाई, असं लढायचं प्रत्येक सेकंद!

- नसिमा हुरजूक

शब्दांकन - अभिजित मुळ्ये
संपर्क

श्री. अयाझ संगरार,

हेल्पर्स ऑफ द हॅन्डीकॅप्ड, कोल्हापूर.

आत्माराम अपार्टमेन्टस्‌,

किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क,

कोल्हापूर - 416003.

दूरध्वनी - 0231-2680026.

Webmaster on September 14th, 2008

Ref.: Dr. Shri Balaji Tambe, Atmasantulana Echo, January 2007

Sarvam anne pratishthitam
…….. Charak Sutrashthan

Acharya Charak has praised food in the following words: Food is one of the essential necessities of every living creature. Without food life cannot go on. From the time of birth until the last breath, all organisms, not only animals upto ants, but also the smallest of organisms like bacteria, even plants, all search for food for their source of energy. This energy existing in food is life force (pran).

Annapaanaadi sarvam sa cha
praaninaam praana-hetur-muulam
punarbala-varnaujasaam
…….. Charak Sutrashthan

Meaning, food and drink are a vital part of the existence of every living being. The strength, physique and ojas (the final transformation of energy from food that is essential for every bodily function and reaction) of every individual have their roots in food.

The right to enjoy good health or to suffer from disease is also very much dependent on the type of food consumed by a person. It naturally follows that nourishing and good quality food give rise to good health and the contrary leads to disease. Hence, Ayurveda offers many “do’s” and “don’ts” with regards to food, especially when an individual is suffering from a disease. In most disease conditions, just taking medicine is not enough. Diet and food restrictions need to be followed hand in hand to help a speedy recovery.